अभियांत्रिकीतील करिअरच्या संधी

   असंख्य बहुपर्यायी आणि उत्तम करिअरकडे घेऊन जाणारे शिक्षण अभियांत्रिक

चांगल्या पगाराची नोकरी, परदेशात जाण्याची संधी, स्पर्धा परीक्षा, संशोधन, उद्योजकता, तंत्रशिक्षणातील तसेच व्यवस्थापकीय क्षेत्रातील उच्च शिक्षणाचे पर्याय, संरक्षण दलातील संधी अशा असंख्य बहुपर्यायी आणि उत्तम करिअरकडे घेऊन जाणारे शिक्षण अभियांत्रिकीचे आहे.त्यामुळे बारावी सायन्सनंतरचा दर्जेदार पर्याय म्हणून बहुसंख्य विद्यार्थी आजही अभियांत्रिकीची पदवी म्हणजेच बीई/बीटेकचा विचार करतात. सध्याच्या काळात आपल्याकडे इंजिनीअरिंग म्हणजे बीटेक असाच उल्लेख केला जातो, तरीही हे लक्षात घ्यावे की, तत्त्वतः बीई आणि बी-टेक यात तसा काही मोठा फरक नाही.

कालावधी
अभियांत्रिकीच्या पदवीचा कालावधी बारावी सायन्सनंतर ४ वर्षांचा आहे. काही विद्यार्थी डिप्लोमा इंजिनीअरिंग करून थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेतात. त्यांच्यासाठी हा कालावधी ३ वर्षांचा असतो. दोन्ही मार्गांनी म्हणजेच दहावीनंतर डिप्लोमा करून नंतर पदवी करणे आणि दहावी नंतर बारावीमार्गे अभियांत्रिकी पदवी करणे या दोन्हींचा कालावधी समानच आहे.

प्रवेश परीक्षा 

बारावी सायन्सनंतर जेईई मेनद्वारे देशभरातील एनआयटी आणि जेईई अॅडव्हान्सडद्वारे आयआयटीमध्ये प्रवेश मिळतो तर, सीईटीद्वारे महाराष्ट्रातील महाविद्यालयांत. शासकीय महाविद्यालये, विद्यापीठाचा अभियांत्रिकी विभाग, शासनमान्य विनाअनुदानित, खासगी विद्यापीठे, स्वायत्त महाविद्यालये अशी अनेक प्रकारची महाविद्यालये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उपलब्ध असतात. सीईटी परीक्षेत पर्सेन्टाइल पद्धतीने गुण जाहीर केले जातात.

विविध शाखा 
मेकॅनिकल, कंम्प्यूटर, आयटी, ईएनटीसी, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पॉलिमर, केमिकल, मेटॅलर्जी, रोबोटिक्स, इंस्ट्रूमेंटेशन, ऑटोमोबाईल, बायोमेडिकल, अॅग्रीकल्चर अशा अनेक शाखांमधून अभियांत्रिकीचे शिक्षण उपलब्ध आहे. सर्व शाखांना स्कोप आहे. तरीही सध्या कंम्प्युटर, एआय, आयटी यांचा ट्रेंड जाणवतो. हा ट्रेंड कालानुरूप बदलत असतो.

अभ्यासक्रमाच स्वरूप
चार वर्षाच्या अभ्यासक्रमात सेमिस्टर पॅटर्न असून, प्रत्येक सेमिस्टरमध्येदेखील विशिष्ट कालावधीनंतर सातत्याने परीक्षा घेतल्या जातात. थेअरीबरोबरच नियमित प्रॅक्टिकल्स असतात. अभ्यासक्रमाच्या शेवटी प्रोजेक्ट वर्कचा समावेश असतो. रीसर्च पेपर्स, कॉन्फरन्स, ट्रायल अँड एरर प्रोजेक्ट्स, टेक्निकल कॉम्पिटिशन्स याही माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधन आणि उद्योजकता यांचे बाळकडू दिले जाते.
पदवीनंतरच्या संधी - एमई, एमटेक, एमएसद्वारे तांत्रिकी क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेता येते. व्यवस्थापन क्षेत्रातील एमबीए, पीजीडीबीएम शिक्षण उपलब्ध आहे. यूपीएससी, एमपीएससी, सीडीएसई आदी परीक्षांद्वारे शासकीय क्षेत्रात जाता येते.

- प्रा. विजय नवले