करिअर : सर्वत्र आहे संधी.. 

बारावीनंतर वेगळ्या वाटेने जाऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या करिअर संधी सध्याच्या काळात सुलभतेने मिळू शकतात. अमूक एखादा अभ्यासक्रम वा संस्थेमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून निराश होण्याचे कारण नाही. आपल्या काही अंगभूत क्षमता, आवड, गती, बलस्थाने लक्षात घेऊन असे अभ्यासक्रम केले व त्यात प्रावीण्य मिळवल्यास यशाच्या पायऱ्या चढणे सोपे जाऊ शकते.


काही अभ्यासक्रम-

(१) योग प्रशिक्षक-

मुंबईमध्ये प्रत्येक वॉर्डात मोफत योग प्रशिक्षणाची घोषणा नुकतीच करण्यात आली. अशा प्रकारची योजना दिल्ली सरकारही राबवत आहे. यामुळे योग प्रशिक्षकांसाठी नव्या संधी निर्माण होतील. तसेही गेल्या काही वर्षात उत्तम आणि सृदृढ आरोग्यासाठी योगाकडे वळणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. ही संख्या पुढेही अशीच वाढत राहील. ही बाब लक्षात ठेऊन चांगल्या संस्थेतून योग विषयक अल्प किंवा दीर्घ मुदतीचे अभ्यासक्रम केल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. महत्वाची संस्था- मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग, नवी दिल्ली- ११०००१,संकेतस्थळ-http://www.yogamdniy.nic.in/.

(२) वेडिंग प्लॅनर-

सुबक–सुंदर अशा पध्दतीने लग्नसमारंभ साजरा करण्याकडे कल वाढलेला आहे. त्यासाठी चांगला खर्च केला जातो. हा सोहळा संस्मरणीय व्हावा, काही काळ आपली वाहवा होत रहावी, हा सुप्त हेतूही असतो. वेडिंग प्लॅनरमार्फत असे सोहळे आयोजित केले जातात. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढलेल्या आहेत. इव्हेंट मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम केलेले उमेदवार या क्षेत्रात करिअर घडवू शकतात. तुम्ही केलेले उत्कृष्ट काम तुम्हाला पुढील संधी मिळवून देतात.

(३) मानसोपचार तज्ज्ञ –

मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सांगितले जाते. आपणास मानसिक आजार राहू शकतो, याविषयी खुलेपणाने बोलणाऱ्या आणि या आजाराला दूर करण्यासाठी तज्ज्ञांकडे जाणाऱ्या नागरिकांची संख्या हळूहळू का होईना वाढत चाल्याचे दिसून येते.

(४) ज्वेलरी डिझाईन-

दागिन्यांच्या विविध नावीन्यपूर्ण डिझाइन्सची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील प्रशिक्षण घेऊन काही वर्षे उमेदवारी केल्यावर उत्तमोत्तम करिअर संधी मिळू शकतात.

(५) गुंतवणूक/ संपत्ती व्यवस्थापन-

या क्षेत्राविषयी जाणीवजागृती करण्यासाठी बरीच वृत्तपत्रे आणि इतर माध्यमांनी गेल्या काही वर्षात मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळे नागरिकांची मानसिकता, बचत ते गुंतवणूक ते संपत्ती निर्मिती अशी बदलत चालण्याचे शुभसंकेत मिळू लागले आहेत. त्यामुळे या क्षेत्रात भविष्यात चांगल्या संधी मिळू शकतात. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या शिक्षण विभागाने (www.bsebti.com) किंवा आयसीआयसीआय बँकेने(icicidirect.com/knowldge-center/learn-hub) या संदर्भातील प्रशिक्षण सुरु केले आहेत.

(६) सायबर सिक्युरिटी –

डिजिटल व्यवहार ज्या गतिने वाढताहेत त्याच गतिने सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ती थांबवणे शक्य नसले तरी अशा गुन्ह्यांना थोपवणे, या गुन्ह्यांचा पाठलाग करणे, डिजिटल व्यवस्था सुरक्षित करणे यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांची मोठी गरज भासेल. या विषयातील पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रम भविष्यात उत्तमोत्तम संधी मिळवून देऊ शकतात.

(७) वृध्दांसाठी केअर टेकर किंवा केअर गिव्हर-

कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका वृध्दांना बसल्याचे दिसून आले. त्यामुळे वृध्दांची देखभाल करणाऱ्या नव्या मनुष्यबळाची गरज यापुढील काळात भासेल.

(८) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग-

या तंत्रकौशल्यास सध्या सर्वाधिक मागणी आहे. अभियांत्रिकीसोबतच इतरही क्षेत्रात या विषयातील तज्ज्ञांची सेवा घेण्याकडे कल वाढलेला दिसतो. मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी सध्यातरी परिस्थिती दिसते. या विषयाचे महत्व लक्षात घेऊन बऱ्याच अभियांत्रिकी संस्थांनी आता थेट या विषयाचे चार वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

(९) टॉय डिझाइन –

सर्व जगात खेळण्यांचे मार्केट मोठे आहे. मात्र या क्षेत्रात चिनने लक्षणीय आघाडी घेतली आहे. भारतातसुध्दा चीनमध्ये तयार झालेली खेळणी प्रचंड प्रमाणात विकली जातात. या क्षेत्रात निर्यातीची मोठी संधी आणि भारतातील कुशल कारागिरी लक्षात घेता आपला देश या क्षेत्रात जगामध्ये आघाडीवर जावा यासाठी आपले पंतप्रधान आग्रही आहेत. त्यासाठी भारत सरकारमार्फत काही योजना आणि सवलतीही दिल्या जातात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, गांधीनगर, या संस्थेत एम. डिझाइन इन टॉय ॲण्ड गेम डिझाइन, हा अडीच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम चालवला जातो. प्रॉडक्ट डिझाईन हा अभ्यासक्रम करणारे विद्यार्थीसुध्दा या क्षेत्राकडे वळू शकतात.

(१०) इंटिरिअर डिझाइन-

आपल्याकडील मध्यम आणि उच्चमध्यम वर्गीय नागरिकांची क्रयशक्ती वाढली आहे. स्वाभाविकपणे याच्याशी सुसंगत अशा जीवनशैलीला ते अंगिकारताना दिसतात. आपल्या राहत्या घरांना अधिक सुंदर आणि देखणे करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यासाठी भरपूर खर्च करण्याची त्यांची तयारी असते. पूर्वीसारखे एकदा घराचे इंटेरिअर डिझाइन केले की मग पुढे बघायची गरज नाही, अशी मनोवस्था राहिलेली नाही. काही विशिष्ट कालावधीनंतर नव्या डिझाइनवर मनापासून खर्च केला जातो. त्यामुळे इंटेरिअर डिझाइनची पदविका/ पदवी/ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना उत्तमोत्तम संधी मिळू लागल्या आहेत.

(११) कंटेट डेव्हलपर/ कंटेट क्रिएटर्स/ व्हिडिओ एडिटर्स आणि ऑपरेटर –

ओटीटी (ओव्हर द टॉप) सारख्या डिजिटल माध्यमाने गेल्या दोन-तीन वर्षात घेतलेली उंच उडी विस्मयचकित करणारी आहे. आता थेट मनोरंजाचा काळ असून तुमच्या हातातील टॅबेलट/मोबाईल यावर तुम्हाला हव्या त्यावेळी, हवे ते आणि हवे तेवढे बघण्याची सुविधा डिजिटल माध्यमाने निर्माण करुन दिली आहे. मनोरंजन वाहिन्या आणि स्टुडिओ यांचा भर थेट प्रेक्षकांकडे म्हणजेच ग्राहकाकडे जाण्याचा आहे. त्यासाठी विविध आशय/ विषय/ प्रकार/ पध्दतीच्या कार्यक्रमांची गरज भासू लागलीय. त्याअनुषंगाने व्हीडिओ, संगीत, गेमिंग कार्यक्रम यांच्या निर्मितीला वेग आला आहे. त्यासाठी तंत्रकुशल मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणावर भासेल.

(१२) डिजिटल मार्केटिंग/ई-कॉमर्स-

बहुतेक सर्व मोठ्या कंपन्या/ उद्योग/ व्यावसायिक यांचे, भविष्यातील विक्री आणि विपणन यांचे नियोजन हे डिजिटल प्लॅटफॉर्मशी निगडित राहतील. त्यामुळे डिजिटल कंटेट निर्मिती, विदा विश्लेषण आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचे तंत्र हस्तगत करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल राहील.

सुरेश वांदिले
Email - ekank@hotmail.com